
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)।
स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारकासाठीच्या जागेच्या मुद्यावरून जागामालक डॉ. चंद्रशेखर मदनलाल गट्टाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या रिट याचिकेची सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने सुनावणीनंतर याचिका निर्णयासाठी बंद केली आहे.
डॉ. चंद्रशेखर गट्टाणी यांनी महाराष्ट्र राज्यातील महसूल व वन विभागाच्या धोरणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका (क्रमांक ३४८८/२०१६) दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी महसूल व वन विभागाच्या सचिवासह इतरांना प्रतिवादी केले आहे. ही सुनावणी न्यायमूर्ती अनिल एस. किलोर व न्यायमूर्ती रजनीश आर. व्यास यांच्या खंडपीठासमोर झाली. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. गगन सिंघई व अॅड. हिमांशू खेडीकर यांनी युक्तिवाद केला. राज्य सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील एन.एस. राव तर तिसऱ्या प्रतिवादीतर्फे अॅड. शशिभूषण वाहाणे यांनी बाजू मांडली. २४ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकण्यात आले. खंडपीठानेव्याचिका निर्णयासाठी बंद केली असून, निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी