
रत्नागिरी, 25 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्ह्यात ग्रामपंचायत डाटा ऑपरेटर मानधनामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार सुरू असून याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक सेलचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आपले सरकार सेवा केंद्राच्या संगणक परिचालकांचे मानधन गेल्या चार महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे संगणक परिचालकांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. जिल्ह्यात ४१२ संगणक डाटा ऑपरेटर कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीअंतर्गत ग्रामस्थांना सुविधा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रातर्फे संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीकडून संगणक परिचालकांच्या मानधनाची रक्कम दरमहा वर्ग केली जाते; मात्र ती रक्कम थेट नियुक्त ठेकेदार कंपनीकडे वर्ग होते. कंपनीकडून मानधनाची रक्कम संगणक परिचालकांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येते.
ग्रामपंचायतीकडून दरमहा १२ हजार रुपये कंपनीला अदा करण्यात येतात. मात्र डाटा ऑपरेटरना दरमहा सात हजार रुपये मानधन देण्यात येते. डाटा ऑपरेटरच्या नावे १२ हजार रुपये घेण्यात येत असताना सात हजार रुपये मानधन का देण्यात येते, उर्वरित पाच हजार रुपये कोणाच्या खिशात जातात, असा सवाल जाकीर शेकासन यांनी उपस्थित केला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यात डाटा ऑपरेटरचे गेल्या चार-पाच वर्षांपासून मानधन थकीत आहे. मागणी करूनही डाटा ऑपरेटरच्या मागण्यांकडे कानाडोळा करण्यात येत आहे, असा आरोप जाकीर शेकासन यांनी केला.
लवकरच आपण आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भेटून त्यांना या गैरवहारासंदर्भात माहिती देणार असल्याचे श्री. शेकासन यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी