
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)
बांगलादेशमध्ये हिंदूवर होत असलेल्या कथित अत्याचारांच्या निषेधार्थ आज अमरावती शहरातील राजकमल चौकात बजरंग दल व विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जोरदार घोषणा देत बांगलादेश सरकारचा निषेध केला.बांगलादेशमध्ये हिंदू नागरिकांवरील अत्याचारांच्या घटना सातत्याने वाढत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.अलीकडेच एका हिंदू व्यक्तीची निर्घृणपणे हत्या झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध आंदोलकांनी व्यक्त केला.या प्रकारामुळे हिंदू समाजात भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे सांगत, आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली.आंदोलनादरम्यान “हिंदूंवरील अत्याचार थांबवा”, “बांगलादेश सरकारने अल्पसंख्याकांचे संरक्षण करावे” अशा घोषणा देण्यात आल्या. राजकमल चौक परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, मात्र पोलिसांचा बंदोबस्त तैनात असल्याने परिस्थिती नियंत्रणात होती.या आंदोलनात बजरंग दलासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बांगलादेशातील हिंदू समाजाच्या सुरक्षिततेसाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी