
रत्नागिरी, 25 डिसेंबर, (हिं. स.) : साखरपा (ता. संगमेश्वर) येथील श्रीमान दत्तात्रय कबनूरकर इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये रोबोटिक आणि एआय तंत्रज्ञानाची प्रयोगशाळा सुरू करण्यात आली आहे. या लॅबला माजी खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी भेट देऊन पाहणी केली. या शाळेच्या प्रगतीबाबत त्यांनी गौरवोद्गार काढले.
शाळेचे चेअरमन श्रीधर कबनूरकर यांनी डॉ. सहस्रबुद्धे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान केला. स्काय रोबोटिक्स संस्थेच्या माध्यमातून शाळेत लॅब सुरू करणारे संस्थेचे डायरेक्टर अभिजित सहस्रबुद्धे आणि कृष्णामूर्ती बुक्का यांचाही शाळेतर्फे स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. चतुरंग प्रतिष्ठानचा सर्वोत्तम विद्यार्थी गोडबोले पुरस्कार मिळवणारी विद्यार्थिनी स्वरा संतोष पांगळे हिचा सत्कार विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी सहस्रबुद्धे यांनी शाळेच्या आजवरच्या वाटचालीविषयी समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागात अशी संस्था एखादी शाळा सुरू करून रोबोटिक लॅबचा प्रयोग करते, हे कौतुकास्पद आहे, असे ते म्हणाले. ग्रामीण भागात विज्ञान तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळत असेल तर असे विद्यार्थी शहरातील विद्यार्थ्यांपेक्षा कुठेही मागे राहणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळेचा इतिहास आणि परंपरांची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले.यावेळी शाळेचे पालक प्रतिनिधी, संस्था चेअरमन श्रीधर कबनूरकर, स्काय रोबोटिक संस्थेचे अभिजित सहस्रबुद्धे, कृष्णमूर्ति बुक्का, देवरूख वाचनालयाचे अध्यक्ष ग. के. जोशी, मुकुंद जोशी, निवृत्त शिक्षक मधु आठल्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी