
रत्नागिरी, 25 डिसेंबर, (हिं. स.) : देवरूख येथील न्यू इंग्लिश स्कूल व सृजन इनोव्हेटिव्ह अॅण्ड अॅक्टिव्हिटी सेंटर फॉर सायन्स येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात रत्नागिरीच्या मिस्त्री हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. माध्यमिक गटातील मॉडेल प्रकारात प्रथम क्रमांक मिळविल्याने शाळेची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
स्पर्धेत मिस्त्री हायस्कूलच्या कु. मुनिबा मुकद्दर बारगीर व कु. अरफिन लियाकत बारगीर या विद्यार्थिनींनी सादर केलेले ‘स्मार्ट ट्रॅफिक सिग्नल’ हे नावीन्यपूर्ण व उपयुक्त मॉडेल विशेष आकर्षण ठरले. वाढती वाहतूक कोंडी, अपघातांचे वाढते प्रमाण आणि वेळेची नासाडी या गंभीर समस्यांवर तांत्रिक उपाय सुचवणारे हे मॉडेल सेन्सर व स्वयंचलित प्रणालीवर आधारित आहे. रहदारीनुसार सिग्नलचे नियंत्रण कसे करता येईल, याचे प्रभावी आणि सुलभ सादरीकरण विद्यार्थिनींनी केल्यामुळे परीक्षकांनी या मॉडेलचे विशेष कौतुक केले. या प्रणालीमुळे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होऊन इंधन बचत, वेळेची बचत तसेच पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागेल, असे मत परीक्षक समितीने व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी विद्यार्थिनींना इम्तियाज सिद्दिकी, निशात राजवडकर, फरहत मिरकर, इक्बाल मुजावर, हुजेफा मुकादम यांचे मार्गदर्शन लाभले. प्रयोगशाळा सहाय्यक इम्तियाज काझी यांनी तांत्रिक बाबींमध्ये विशेष सहकार्य केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी