
जळगाव , 25 डिसेंबर (हिं.स.)जळगाव महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकची प्रक्रिया अधिकृतरित्या सुरू झाली असून निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शनिवार, रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशीही जळगाव महानगरपालिकेची सर्व कार्यालये सुरू राहणार असून याबाबतचे आदेश मनपाचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी काढले आहे. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू असून निवडणूक प्रक्रियेसाठी उमेदवारांना आवश्यक असलेली नामनिर्देशनपत्रे, शपथपत्रे, जात वैधता प्रमाणपत्र, थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालयाचा दाखला आदी कागदपत्रे विहित मुदतीत सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची विविध दाखल्यांसाठी महापालिकेत मोठी गर्दी दिसून येत आहे. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शनिवार, रविवार तसेच शासकीय सुटीच्या दिवशीही जळगाव महानगरपालिकेची सर्व कार्यालये पूर्ण वेळ सुरू राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व विभागप्रमुखांनी याची नोंद घ्यावी व आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना याबाबत सूचना द्याव्यात, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, निवडणूक प्रक्रिया सुरू असताना जर कोणते अधिकारी किंवा कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित राहिले, तर त्यांच्यावर लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. हा आदेश आयुक्त तथा निवडणूक अधिकारी जळगाव शहर महानगरपालिका यांनी जारी केला असून, सर्व विभागप्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची प्रत पाठविण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर