
रत्नागिरी, 25 डिसेंबर, (हिं. स.) : गेली पाच-सहा वर्षे रखडलेले चिपळूण एसटी डेपोचे काम आवश्यक तो अतिरिक्त निधी उपलब्ध करून देत लवकरच मार्गी लावण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना उपनेते तथा चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण यांना दिले आहे.
चिपळूण एस. टी. डेपोच्या इमारतीचे भूमिपूजन होऊन सहा वर्षे झाली, तरी काम अर्धवट राहिले आहे. यादरम्यान ठेकेदार बदलले असले तरी कामाची गती अत्यंत मंद आहे. यासंदर्भात अनेक आंदोलने झाली, मात्र ठोस कार्यवाही न झाल्याने प्रवासीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन रखडलेल्या कामाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी श्री. सरनाईक यांनी या विषयावर विशेष बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. तसेच काम पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त निधीची गरज भासल्यास त्याचीही व्यवस्था करण्यात येईल आणि कोणत्याही परिस्थितीत लवकरात लवकर काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले.
या भेटीवेळी माजी बांधकाम सभापती विनोद झगडे, चिपळूण तालुकाप्रमुख संदेशबापू आयरे, उपशहरप्रमुख विकी लवेकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी