अंजनगाव अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वार्ड ३ ने फिरवला निकालाचा खेळ
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.) अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल केवळ विजय-पराभवापुरता मर्यादित न राहता, स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांचे स्पष्ट दर्शन घडवणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार अविनाश गायगोले यांनी अवघ्या १२४
अंजनगाव अध्यक्षपदाच्या निवडणुकीत वार्ड ३ ने फिरवला निकालाचा खेळ.


अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)

अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल केवळ विजय-पराभवापुरता मर्यादित न राहता, स्थानिक राजकारणातील बदलत्या समीकरणांचे स्पष्ट दर्शन घडवणारा ठरला आहे. भाजपचे उमेदवार अविनाश गायगोले यांनी अवघ्या १२४ मतांच्या फरकाने मिळवलेला विजय हा आकड्यांपेक्षा रणनीतीचा विजय असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.या निवडणुकीत बारी समाजाची मते निर्णायक ठरतील, असा पूर्वअंदाज होता. बारी समाजाची सून असलेल्या डॉ. स्पृहा डकरे यांना प्रभाग क्रमांक १, ४ आणि सुर्जी भागातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये लक्षणीय मताधिक्य मिळाले आणि हा अंदाज बहुतांशी खरा ठरला.मात्र, या सर्व गणितांना छेद देणारा ठरला प्रभाग क्रमांक ३ (बारगनपुरा). बारी समाज बहुल असतानाही या प्रभागात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अविनाश गायगोले यांना ११६१ मते मिळाली, जी डॉ. डकरे यांच्यापेक्षा सुमारे साडेतीनशेने अधिक होती. याच मताधिक्यामुळे संपूर्ण शहरातील अत्यंत अटीतटीच्या लढतीत भाजपला आघाडी घेता आली.राजकीय निरीक्षकांच्या मते, प्रभाग क्रमांक ३ मध्ये जर पारंपरिक जातीय मतदानाचा कल कायम राहिला असता, तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा निकाल पूर्णतः वेगळा लागण्याची शक्यता होती. त्यामुळेच हा प्रभाग भाजपच्या विजयाचा कणा ठरल्याचे सांगितले जात आहे.या बदलत्या मतदान प्रवाहामागे नगरसेवक प्रवीण नेमाडे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. स्थानिक प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत, व्यक्तीगत संपर्क, नियोजनबद्ध प्रचार आणि मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्याची रणनीती त्यांनी अवलंबल्याचे बोलले जाते. परिणामी, अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराला चार अंकी मतांचा टप्पा गाठता आला.विशेष म्हणजे, प्रभाग क्रमांक ३ मधील दोन्ही नगरसेवक उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. संपूर्ण शहरात भाजपचे ६ नगरसेवक निवडून आले असून, त्यातील सर्वाधिक मताधिक्य याच प्रभागात नोंदवले गेले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande