अमरावती : दोन दिवसात पाणी न सोडल्यास दहेगाव धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा
अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.) रब्बीच्या हंगामात दहेगाव धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या तब्बल ६० पेक्षा जास्त शेतकरी अडचणीत सापडले आहे. गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप धरणाच्या कॅनलचे बांधच दुरुस्त झाले नाही. परिणामी रब्बी हं
दोन दिवसात पाणी न सोडल्यास दहेगाव धरणात जलसमाधी आंदोलनाचा इशारा


अमरावती, 25 डिसेंबर (हिं.स.)

रब्बीच्या हंगामात दहेगाव धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या तब्बल ६० पेक्षा जास्त शेतकरी अडचणीत सापडले आहे. गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनही अद्याप धरणाच्या कॅनलचे बांधच दुरुस्त झाले नाही. परिणामी रब्बी हंगामातील गव्हाची पेरणी लागली आहे. कंत्राटदाराच्या निकृष्ट कामाचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी मृद्जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता निकिता देशमुख यांच्याकडे फोनद्वारे तक्रार केली होती. त्यावरून त्यांनी बुधवारी धरणाच्या कॅनलची पाहणी केली.

यावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी कॅनलच्या निकृष्ट बांध फुटून शेतात पाणी घुसल्याने दरवर्षी पिकांचे अतोनात नुकसान होत असल्याच्या तक्रारी सांगितल्या. तर अनेक कॅनल गेट अद्यापही मातीच्या गाळाने भरून असल्याचे कार्यकारी अभियंता देशमुख यांच्या निदर्शनास प्रशांत कांबळे यांनी आणून दिले. त्याशिवाय, संपूर्ण कॅनल बंधाऱ्यामध्ये अनेक ठिकाणी बंधारा खोलीकरण सुद्धा करण्यात आले बसून, त्यामधील वाळलेल्या गवताचा कचरा सुद्धा तसाच कॅनलच्या बांधांमध्ये असल्याचे देशमुख यांच्या निदर्शनास आल्याने यासंदर्भात सुधारणा करण्याच्या सूचना देशमुख यांनी कंत्राटदाराला दिल्या.

ठेकेदाराचा लहरी वृत्तीमुळे धरणाच्या कॅनल बांधांचे कामे वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. अशा परिस्थितीत अद्यापही शेतकरी धरणाच्या पाण्याची वाट पाहत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात जर धरणाचे पाणी जर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचले नाही तर दहेगाव धरणाच्या पाण्यात शेतकऱ्यांसोबत जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी दिला आहे. यावेळी चंदू हगवणे, शिरजगाव मोझरी ग्रामपंचायत सदस्य पुरुषोत्तम मेश्राम, ललित हगवणे, हर्षल मेश्राम, दिपक वाडीभसमे, विनोद मेश्राम, भालेराव यासह अनेक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.————------------

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande