
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)
महायुतीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटण्याची चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. शहरातील हॉटेल ग्रॅण्ड मैफिल येथे आज महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री संजय राठोड, माजी आमदार अभिजीत अडसूळ आणि शिवसेना नेत्या प्रीती बंड उपस्थित होते. भाजपकडून माजी मंत्री प्रवीण पोटे व शहराध्यक्ष नितीन धांडे यांच्यासह अनेक नेत्यांनी बैठकीला हजेरी लावली.त्यामुळे कन्फ्युजन, सोल्यूशनचा पत्ताच नाही! अशी म्हणायची वेळ दोन्ही गटातील उमेदवारांवर आली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून महायुतीत 20 ते 25 जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. मात्र, भाजपच्या कोअर कमिटीबरोबर झालेल्या चर्चेत अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. यापूर्वी नागपुरात जागा वाटपावर बैठक झाली होती. आता अमरावतीतही सलग चर्चेची मालिका सुरू असली तरी निर्णय पुढे ढकलला जात असल्याचे चित्र आहे.जागावाटपावरून महायुतीत मतभेद वाढत असल्याची राजकीय कुजबुज सुरू असून, युती फिस्कटण्याची शक्यता काही राजकीय वर्तुळांतून व्यक्त केली जात आहे. तरीही अधिकृत पातळीवर कोणतीही घोषणा झालेली नाही. सर्वांच्या नजरा आता महायुतीच्या अंतिम निर्णयाकडे लागल्या आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी