लातूर शहर महानगरपालिका निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
लातूर, 26 डिसेंबर (हिं.स.)।लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त अनेक अधिकाऱ्यांना गत एक ते दीड वर्षात झालेल्या विविध निवडणुकांचा अनुभव आहे. मात्र, तरीही महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पाडताना सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्
लातूर शहर महानगरपालिका निवडणूक तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


लातूर, 26 डिसेंबर (हिं.स.)।लातूर शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी नियुक्त अनेक अधिकाऱ्यांना गत एक ते दीड वर्षात झालेल्या विविध निवडणुकांचा अनुभव आहे. मात्र, तरीही महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया पार पाडताना सर्वांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी समन्वयाने व गांभीर्याने काम करावे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सर्व सूचना, नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. निवडणूक प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.

लातूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या उपस्थितीत सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. लातूर शहर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रीमती मानसी, अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके, संदीप कुलकर्णी, सुशांत शिंदे, रोहिणी नऱ्हे-विरोळे, मंजुषा लटपटे, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, आदर्श आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी आम्रपाली कासोदेकर, महानगरपालिका उपायुक्त डॉ. पंजाबराव खानसोळे, वसुधा फड, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, श्याम वाखर्डे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशीषकुमार अय्यर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.

नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यापासून ते मतमोजणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडावी. या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगामार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या अद्ययावत सूचनांचा अवलंब करावा. सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा, मतदान यंत्रे याबाबत आवश्यक सज्जता करावी. कोणत्याही मतदान केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. मतदान केंद्रांवर सूचना फलक, दिशादर्शक फलक लावून गर्दी टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. तसेच या निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या 65 मतदान केंद्रांबाबत पुरेशी प्रसिद्धी करून मतदारांना माहिती द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या. आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेली भरारी पथके, स्थिर निगराणी पथके, व्हिडीओ सर्व्हीलंस टीमसह सर्व पथकांनी सतर्क राहून काम करावे, असे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांनी माहिती दिली. महानगरपालिका मतदानासाठी एकूण मतदार, प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी व इतर आवश्यक पथकांची स्थापना, मतदान केंद्रांची माहिती, विविध परवानग्यांसाठी एक खिडकी, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या पथके, मतदार जागृतीसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांबाबत यावेळी सादरीकरण करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande