

रायगड, 26 डिसेंबर, (हिं.स.)। शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी धक्कादायक घटना सकाळी घडली. नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची भररस्त्यात धारदार शस्त्रांनी वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने खोपोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मयताचे नाव मंगेश काळोखे (वय अंदाजे ४०) असून ते शिवसेना (शिंदे गट)च्या नवनिर्वाचित नगरसेविका मनसी काळोखे यांचे पती होते. मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश काळोखे हे आपल्या मुलाला शाळेत सोडून दुचाकीवरून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करून अचानक हल्ला चढवला.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांकडे कोयते व इतर धारदार शस्त्रे होती. त्यांनी मंगेश काळोखे यांच्यावर सपासप वार केल्याने ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. हल्ला करून आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी उपचारांपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसर सील करून पंचनामा करण्यात आला. तसेच सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात ही हत्या पूर्ववैमनस्य किंवा राजकीय वादातून झाली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, दिवसाढवळ्या घडलेल्या या हत्येमुळे नागरिकांमध्ये भीती व संतापाचे वातावरण असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी लवकरच गुन्हे उघडकीस आणण्याचे आश्वासन दिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके