
जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.)जळगाव एमआयडीसी व निमखेडी शिवारात राज्य उत्पादन शुल्क विभागाने तीन जणांवर कारवाई करत ६८ लिटर गावठी दारूसह देशी मद्याचा साठा जप्त केला.होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीची आचारसंहिता व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात बेकायदेशीर मद्याचा पूर वाहण्याची शक्यता लक्षात घेता राज्य उत्पादन शुल्क विभागाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानंतर जळगाव विभागानेही कारवाईचा बडगा उचलला आहे. नववर्ष व निवडणूक काळात शहरात अवैध मद्य येऊ नये यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पाच विशेष फिरती पथके तैनात केली आहेत. जळगाव शहरात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक मुख्य रस्त्यावर या पथकांचा वॉच असणार आहे. पहिल्याच दिवशी निमखेडी शिवार व एमआयडीसीत कारवाई करण्यात आली. या कारवाईत एकूण ८,६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यात ४.३२ लिटर देशी आणि एकूण ६८ लिटर घातक गावठी दारूचा समावेश आहे. सध्याच्या नियमानुसार या तिघांना पहिली ताकीद देऊन नोटीस बजावण्यात आली असली, तरी यापुढील गुन्ह्यासाठी त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागणार आहे. देशी मद्याच्या किमती वाढल्याने सराईत गुन्हेगार हातभट्टी आणि विषारी गावठी दारू विक्रीकडे वळले आहेत. जे गुन्हेगार तीनपेक्षा जास्त वेळा पकडले गेले आहेत, त्यांच्यावर आता एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबद्ध केले जाईल किंवा हद्दपारीची कारवाई होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर