पैसे व वस्तू लुटणाऱ्या ढोंगी साधूंना चोप देत पोलिसांच्या ताब्यात
जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) साधूंच्या वेशात शहरात दाखल होऊन दुकानदारांना विविध सुगंध व औषधांचा वास देत गुंगी आणून पैसे व वस्तू लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीचा तरुणांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला. नागरिकांनी या ढोंगी साधूंना चांगलाच चोप देत पोलिसांच्य
पैसे व वस्तू लुटणाऱ्या ढोंगी साधूंना चोप देत पोलिसांच्या ताब्यात


जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) साधूंच्या वेशात शहरात दाखल होऊन दुकानदारांना विविध सुगंध व औषधांचा वास देत गुंगी आणून पैसे व वस्तू लुटणाऱ्या चार जणांच्या टोळीचा तरुणांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला. नागरिकांनी या ढोंगी साधूंना चांगलाच चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले, त्यानंतर पोलीस ठाण्यातही त्यांना ‘महाप्रसाद’ देण्यात आल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर शहरात चार ते पाच साधूंच्या वेशातील टोळी दाखल झाली होती. धुळे रोडवरील तुळजाई हॉस्पिटल परिसरात समर्थ ट्रेडिंगचे मालक जितेंद्र पाटील यांच्याजवळ हे साधू गेले. त्यांनी टिळा लावून कशातरी सुगंधाच्या किंवा गुंगी आणणाऱ्या औषधाच्या नावाखाली दुकानदाराला वश करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर एका साधूने बळजबरीने दुकानात प्रवेश करत थेट गल्ल्यात हात घातला व पाच हजार रुपयांची रोख रक्कम तसेच काही वस्तू लांबवल्या. ही बाब लक्ष्मी प्रिंटिंगचे संचालक अतुल भदाणे यांच्यासह सनी पाटील, कार्तिक चौधरी, मेहुल चौधरी आणि शेषनाथ बागुल यांच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दुकानदाराला सावध केले. साधूंना पकडून त्यांनी लुबाडलेली रक्कम व वस्तू परत काढून दिल्या. या प्रकाराची माहिती मिळताच परिसरात मोठी गर्दी जमली आणि संतापलेल्या नागरिकांनी ढोंगी साधूंना चोप दिला. घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संबंधित बहिरूपी साधूंना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत हे चारही साधू गुजरात येथील असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास सुरू असून अशा प्रकारे भोळ्या-भाबड्या नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, काही ढोंगी साधू नागरिकांच्या अंधश्रद्धेचा फायदा घेत भविष्य, उपाययोजना, मोहिनी घालणे अशा प्रकारच्या आमिषाने घरात किंवा दुकानात प्रवेश करून लूटमार करतात. कुंभमेळा, पायी वारी, दिंडी, नवनाथ किंवा गडावर जाण्याच्या नावाखालीही फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, अंधश्रद्धेला बळी पडू नये आणि संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande