जळगाव : ‘दुप्पट पैशांचे’ आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) सोशल मीडियाच्या माध्यमातून जादा पैशांचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एक लाख रुपये द्या, दहा लाख रुपये मिळवा अशा आशयाचे व्हिडिओ (रिल्स) प्रसारित करून नागरिकांची दिश
जळगाव : ‘दुप्पट पैशांचे’ आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश


जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) सोशल मीडियाच्या माध्यमातून जादा पैशांचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा मुक्ताईनगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. एक लाख रुपये द्या, दहा लाख रुपये मिळवा अशा आशयाचे व्हिडिओ (रिल्स) प्रसारित करून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील लालगोटा येथील रहिवासी शिवकुमार शमी भोसले, देवकुमार शिवराज भोसले आणि सुजिता उर्फ सुजाता शिवकुमार भोसले यांनी संगनमत करून हा फसवणुकीचा कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे. या टोळीने फेसबुकवर ‘Saawariya Set’ नावाचे प्रोफाईल तयार करून तसेच इंस्टाग्राम व इतर समाजमाध्यमांवर व्हिडिओ अपलोड केले होते. या व्हिडिओंमध्ये १ लाख रुपयांच्या बदल्यात १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून, प्रत्यक्षात बनावट चलनी नोटांच्या स्वरूपात फसवणूक करण्याचा त्यांचा उद्देश होता.हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास येताच पोलीस कॉन्स्टेबल सागर राजू सावे यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली २५ डिसेंबर रोजी संशयित आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून “CHILDREN BANK OF INDIA – पाचशे रुपये” असे छाप असलेल्या एकूण १०६५ बनावट कागदी नोटा तसेच ५ अँड्रॉईड मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. या मोबाईलमधून फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले सोशल मीडिया अकाउंट्स, व्हिडिओ व इतर डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande