
नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)।
- तपोवन वृक्षतोड प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) तात्पुरती स्थगिती दिली असली, तरी हा लढा अद्याप संपलेला नाही. वृक्षप्रेमींनी आगामी काळातील घडामोडींवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणे गरजेचे आहे अन्यथा, नाशिकच्या पर्यावरणाची कधीही भरून न निघणारी हानी होईल, असा इशारा ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीराम पिंगळे यांनी दिला.
खुटवडनगर येथील सिटू भवनमध्ये आयोजित डॉ. नरेंद्र दाभोलकर विवेक व्याख्यानमालेत ते बोलत होते. व्यासपीठावर मानव अधिकार संवर्धन संस्थेचे अध्यक्ष शांताराम चव्हाण, रोशन केदार, प्रा. मिलिंद वाघ, मुक्ता कावळे आदी उपस्थित होते. अॅड. पिंगळे यांनी तपोवन वृक्षतोडीविरोधात हरित लवादात याचिका दाखल केली असून, या कायदेशीर लढाईतील सविस्तर टप्पे त्यांनी मांडले. अॅड. पिंगळे म्हणाले की, तपोवन वृक्षतोडीबाबत मनपा प्रशासन महत्त्वाची माहिती लपवत आहे. अभ्यास करतात, समाजाची नस ओळखतात; मात्र प्रत्यक्ष निर्णय घेताना त्यांचा सामाजिक रेट्याला अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV