
रायगड, 26 डिसेंबर (हिं.स.)। विश्व हिंदू परिषद व रायगड जिल्हा बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने म्हसळा शहरात गीता जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने म्हसळा न्यू इंग्लिश स्कूल येथून श्री धाविदेव महाराज मंदिरापर्यंत भव्य शौर्य पदसंचलन काढण्यात आले.
या पदसंचलनात भगवे ध्वज, जय श्रीराम व भारत माता की जयच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. हिंदू ग्रामस्थ व महिलांकडून पुष्पवृष्टी करून संचलनाचे स्वागत करण्यात आले. मंदिर परिसरात झालेल्या सभेत मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले.
सभेचे प्रमुख वक्ते दिपक महाराज जगताप यांनी मार्गदर्शन करताना “हिंदू म्हणून संघटित व्हा, देव, देश व धर्मासाठी एकत्र या,” असे आवाहन केले. देशासमोर अनेक आव्हाने असून, अशा काळात संघटनाची नितांत गरज आहे, असे ते म्हणाले. हिंदू समाजातील अंतर्गत मतभेद ही मोठी शोकांतिका असल्याचे नमूद करत धर्मासाठी वेळ देण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्याचे संदर्भ देण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके