
हिंगोली, 26 डिसेंबर (हिं.स.)।
वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हा अग्रणी बँकेमार्फत हक्क न सांगितलेल्या मालमत्तेच्या निपटाऱ्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन सोमवार, दि. 29 डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. हे शिबिर सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह, हिंगोली येथे होणार आहे.
राज्यभरात हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा करण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येत असून त्याच अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातही हे शिबिर होत आहे. विविध बँका व वित्तीय संस्थांमध्ये दीर्घकाळापासून निष्क्रिय किंवा अनाकलनीय असलेल्या ठेव, शेअर्स, लाभांश, विमा पॉलिसी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आदी मालमत्तांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे व योग्य हक्कदारांना त्यांची मालमत्ता मिळवून देण्यासाठी आवश्यक माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या शिबिरात नागरिकांना विविध बँकांमधील निष्क्रिय अथवा अनाकलनीय खात्यांची माहिती व पडताळणी, दावा सादर करण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांबाबत मार्गदर्शन, संबंधित बँकांचे प्रतिनिधी व अधिकाऱ्यांशी थेट संवादाची संधी तसेच ऑनलाईन पोर्टलद्वारे मालमत्तेची तपासणी करण्यासाठी मदत दिली जाणार आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये आर्थिक हक्कांबाबत जागरूकता निर्माण होऊन निष्क्रिय मालमत्ता योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. शिबिरात बँकिंग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी तसेच इतर संबंधित संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी शिबिराला उपस्थित राहून स्वतःची किंवा कुटुंबातील सदस्यांची अनाकलनीय ठेव व मालमत्ता तपासून आपल्या हक्काचा दावा सादर करावा, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी केले आहे.
वित्तीय सेवा विभाग, अर्थ मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच राज्यस्तरीय बँकर्स समिती महाराष्ट्र यांच्या वतीने जिल्हा अग्रणी बँकेमार्फत 29 डिसेंबर रोजी हक्क न सांगितलेल्या मालमत्तेचा निपटारा शिबिर घेतले जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis