
रायगड, 26 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक वारशाला उजाळा देणारा इमेज कॅलेंडर यंदा २०२६ साठी सज्ज झाला आहे. अलिबाग येथील इमेज कॅलेंडरच्या छायाचित्र स्पर्धेचा हा आठवा वर्ष असून, हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांच्या कलेला वाव देण्याची ही परंपरा सातत्याने सुरु आहे.
यंदाच्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील पुरातन मंदिरे, गड‑किल्ले, निसर्ग सौंदर्य, पारंपरिक सण अशा विविध विषयांवर छायाचित्रे सादर करण्यात आली. शेकडो छायाचित्रांमधून मान्यवर परीक्षकांच्या माध्यमातून बारा छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे. या निवडीत जिल्ह्यातील दीक्षित कांबळे (महाड), वैभव शिंदे (श्रीबाग), महेंद्र महाडिक (अलिबाग), शुभम सुंकले (थळ), डॉ. गणेश गवळी (अलिबाग), निलेश दुदम (गोंधळपाडा), भारत रांजणकर (मुरुड), सनीश म्हात्रे (मिळकतखर), जयंत ठाकूर (पेण), कल्पेश पाटील (महाड), मोनिका औचटकर (बेलोशी), सुनील ठोकळ (अलिबाग) यांचा समावेश आहे.
स्पर्धेसाठी आलेल्या शेकडो छायाचित्रांमधून कॅलेंडरच्या बारा पानांसाठी निवड करणे जिकरीचे होते. त्यासाठी अलिबाग येथील ज्येष्ठ पत्रकार आणि दैनिक पुढारीचे रायगड आवृत्ती प्रमुख जयंत धुळप यांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले. त्यांच्या सखोल परीक्षणानंतर अंतिम निवड करण्यात आली.
इमेज कॅलेंडरचे संस्थापक जितू शिगवण, रमेश कांबळे आणि समीर मालोदे यांनी सांगितले की, कॅलेंडरच्या पहिल्या पानापासूनच छायाचित्रकारांची कलाकृती वाचकांना पाहायला मिळणार आहे. यंदा रायगडच्या निसर्गाने नटलेल्या सौंदर्याची आणि वारशाची ही झलक २०२६ च्या इमेज कॅलेंडरमध्ये सजली आहे, जी छायाचित्रप्रेमींना नक्कीच आकर्षित करणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके