
बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)।
नुकत्याच संपन्न झालेल्या हिवाळी अधिवेशनात लातूर - कल्याण (जनकल्याण द्रुतगती महामार्ग) निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली असून हा प्रकल्प लातूर - अंबाजोगाई - केज - जामखेड - अहिल्यानगर मार्गे कल्याण या मार्गावर राबविणे अपेक्षित आहे. मात्र हा महामार्ग बीड जिल्ह्याऐवजी धाराशिव जिल्ह्यातून वळवण्यात येणार असल्याची चर्चा होत असल्याने हा महामार्ग अन्यत्र वळवण्यात येऊ नये याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार धनंजय मुंडे यांनी पत्राद्वारे विनंती केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की
या महामार्गावर परळीचे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग अवघ्या १५ किमी अंतरावर जोडले जाणार असून या महामार्गामुळे बीड जिल्ह्यात औद्योगिक प्रगती, दळणवळण सुलभता, शेतीमालाची वाहतूक अशा एकूणच आर्थिक उन्नतीत भर घालणारा हा प्रकल्प एक प्रभावी घटक ठरणार आहे.
बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना देखील कमी वेळेत उत्पादित शेती माल मुंबई, कल्याण, पुणे सारख्या प्रमुख बाजार पेठांमध्ये पोचवणे कमी खर्चात शक्य होणार आहे. वाहतूक सेवेसह रोजगार निर्मिती साठी हा प्रकल्प एक मोठी संधी ठरणार आहे.
हा नियोजित महामार्ग बीड जिल्ह्याऐवजी बदलून धाराशिव जिल्ह्यातून वळवण्यात यावा यासाठी प्रयत्न सुरू असून बीड जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असलेला हा प्रकल्प अन्यत्र वळवणे हे दुर्दैवी व बीड जिल्ह्यातील जनतेवर अन्यायकारक ठरेल.
बीड जिल्ह्यात आधीच दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, स्थलांतर, मर्यादित औद्योगिक वसाहती अशा अनेक समस्यांना आम्ही तोंड देत आहोत. त्यात या महामार्गाच्या निमित्ताने विकासाची चालून आलेली संधी हिरावून घेतल्यास जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी, व्यापारी, युवक, सामाजिक संघटना आदींच्या मनात असंतोष निर्माण होऊन प्रसंगी लोकशाही मार्गाने जनआंदोलन छेडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे जनभावना व नैसर्गिक न्यायाच्या भूमिकेतून राज्य शासनाने प्रस्तावित लातूर - कल्याण (जनकल्याण द्रुतगती महामार्ग) मूळ नियोजनाप्रमाणे बीड जिल्ह्यातूनच राबवावा, अशी नम्र विनंती या पत्राद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis