रत्नागिरी : महाभारत म्हणजे भारताचा वैभवशाली इतिहास : धनंजय चितळे
रत्नागिरी, 26 डिसेंबर, (हिं. स.) : महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, तर भारताचा वैभवशाली इतिहास आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील प्रवचनकार धनंजय चितळे यांनी केले. कीर्तनसंध्या आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत त्यांची दोन
प्रवचनकार धनंजय चितळे यांचे स्वागत करताना माधव हिर्लेकर


रत्नागिरी, 26 डिसेंबर, (हिं. स.) : महाभारत हे केवळ महाकाव्य नव्हे, तर भारताचा वैभवशाली इतिहास आहे, असे प्रतिपादन चिपळूण येथील प्रवचनकार धनंजय चितळे यांनी केले.

कीर्तनसंध्या आणि कऱ्हाडे ब्राह्मण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीत त्यांची दोन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये चितळे यांनी महाभारताच्या अनेक पैलूंचा थोडक्यात आढावा घेतला.

रत्नागिरीच्या कीर्तनसंध्या परिवाराने आयोजित केलेला पंधरावा कीर्तनसंध्या महोत्सव सहा ते ११ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. रत्नागिरीतील प्रमोद महाजन क्रीडासंकुलात होणार असलेल्या या महोत्सवात राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. विद्यावाचस्पती चारुदत्तबुवा आफळे महाभारत या विषयाचा उत्तरार्ध मांडणार आहेत. त्या अनुषंगाने महाभारत या विषयाची पार्श्वभूमी तयार करण्याच्या उद्देशाने ‘विश्वाचे ज्ञानवैभव महाभारत’ या विषयावर धनंजय चितळे यांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात झालेल्या या व्याख्यानमालेला रत्नागिरीकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पहिल्या दिवशी दीपप्रज्वलन आणि राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. मोरेश्वर जोशी यांनी चितळे यांचा परिचय करून दिला. कऱ्हाडे ब्राह्मण संघ आणि कीर्तनसंध्या परिवाराच्या वतीने चितळे यांचे पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई यांच्यासह पदाधिकारी, तसेच कीर्तनसंध्या परिवारातील अवधूत जोशी, नितीन नाफड, मकरंद करंदीकर, महेंद्र दांडेकर, उमेश आंबर्डेकर आदी उपस्थित होते.

महाभारतात महर्षी व्यासांनी रंगवलेल्या व्यक्तिरेखांचा अभ्यास आपल्याला जीवनविषयक धडे देऊ शकतो. त्यांनी कोणतेही पात्र पूर्णतः सद्गुणी किंवा पूर्णतः दुर्गुणी रंगवलेले नाही. महाभारताबद्दल असलेले गैरसमज केवळ त्याच्या अभ्यासातूनच दूर होऊ शकतात. आपण महाभारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे प्रतिपादन चितळे यांनी केले.

नीतिमूल्यांपासून मनुष्यस्वभावापर्यंत, युद्धतंत्रापासून व्यवस्थापन कौशल्यापर्यंत आणि अध्यात्मापासून विज्ञानापर्यंत सर्वच गोष्टींचे धडे आपल्याला यातून मिळतात. त्यामुळे हे धडे घेण्यासाठी मूळ महाभारताचे बारकाईने वाचन आणि त्यावर चिंतन आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाबाईंनी रामायण-महाभारताच्या कथा सांगितल्या, हे आपण ऐकलेले असते; पण महाभारतात किल्ल्यांबद्दल काय सांगितले आहे हे आपल्याला महाभारत वाचल्यावरच कळू शकते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यातून काय घेतले याचा बोधही आपल्याला महाभारताच्या अभ्यासातूनच होऊ शकतो. महाभारतात भगवद्गीता सांगण्याव्यतिरिक्तही अनेकदा कृष्णार्जुन संवाद झालेला आहे. त्यात अनेक मुद्द्यांचा ऊहापोह झालेला आहे. त्या काळात स्त्रियांना किती मोठ्या प्रमाणावर अधिकार होते हे आपल्याला महाभारताच्या सखोल चिंतनातूनच कळू शकते. महाभारताबद्दलचे गैरसमज दूर होण्यासाठी जिज्ञासूंनी मूळ महाभारत वाचून चिंतन-मनन करावे आणि गैरसमजांना अभ्यासातून उत्तर द्यावे, अशी अपेक्षा चितळे यांनी व्यक्त केली. त्या दृष्टीने कीर्तनसंध्या उपक्रमाचा मोठा उपयोग होणार असून, सर्वांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहनही त्यांनी केले. या निमित्ताने या कालावधीपुरता रत्नागिरी नगर वाचनालयाने महाभारतविषयक पुस्तकांचा वेगळा विभाग तयार करावा, अशी एक कल्पनाही चितळे यांनी मांडली. त्याचा उपयोग जिज्ञासूंना अभ्यासासाठी संदर्भ उपलब्ध होण्यासाठी होऊ शकतो, असे ते म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande