
नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.) उत्तरप्रदेश लखनऊ येथे नुकत्याच झालेल्या १९ व्या राष्ट्रीय स्काऊट गाईड जांबोरीत देशभरातून विविध राज्यांतील ५० हजार स्काऊट गाईड विद्यार्थी आणि स्काऊट गाईड शिक्षक सहभागी झाले होते. सदर जांबोरीत विविध राज्यांना आपआपल्या संस्कृतीवर आधारीत राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे आयोजन केलेले असते. त्यात मानाच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी एक असलेल्या 'लोकनृत्य' या विभागातील राष्ट्रीय स्पर्धेत सविता ताडगे यांनी दिग्दर्शित केलेल्या १६८ विद्यार्थ्यांच्या 'महाराष्ट्राची लोकधारा' हे नृत्य 'अ' श्रेणी राखत सदर जांबोरीत देशात सर्वोत्कृष्ट ठरले, तसेच इंटरनॅशनल ईव्हेंट मध्ये महाराष्ट्राला संधी उपलब्ध करून देण्यात नाशिक जिल्ह्याचा मोलाचा वाटा. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग. आदिवासी सेवा समिती नाशिक संचलीत समाजश्री डॉ. प्रशांतदादा हिरे माध्यमिक विद्यालय अशोकनगर सातपूर या विद्यालयात सविता ताडगे या उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या नृत्यात राज्यातील विविध जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सुप्रसिध्द नृत्य दिग्दर्शिका सविता ताडगे यांनी 'महाराष्ट्राची लोकधारा' या स्पर्धेची तयारी करण्यासाठी नाशिक येथील कार्यालयात नृत्याची अंतिम रंगीत तालीम करून घेतली. सदर नृत्याच्या सरावाप्रसंगी शेखर जाधव यानेही मार्गदर्शनपर महत्वाची भूमिका पार पाडली. जिल्ह्यातील सहभागी शाळेतील स्काऊट गाईड शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी शालेय स्तरावर रंगीत तालिम घेऊन सराव करून घेतला होता. महाराष्ट्राची लोकधारा या नृत्यामध्ये महाराष्ट्र राज्याची वैभवशाली संस्कृती दर्शवणारे अनेक नृत्य प्रकार लावणी, कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, धनगरनृत्य, पोवाडा, वारकरी आदी प्रकारांचा अत्यंत कल्पक समावेश त्यांनी केला होता, नृत्याचे सादरीकरण १२० फूट बाय १२० फूट आकाराच्या भव्य स्टेजवर अत्यंत दिमाखात जोशात सादरीकरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव नृत्य आविष्कारातून देशभरातून आलेल्या ५० हजार विद्यार्थी-शिक्षक पालक, आयोजकांचे व परीक्षकांचे उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे यांची मने जिंकत लखनऊचा आसमंत भगवामय झाला. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ. प्रशांत हिरे, कोषाध्यक्ष डॉ. सौ. स्मिता हिरे, समन्वयक डॉ. अपुर्व हिरे, विश्वस्त डॉ. अद्वय हिरे, विश्वस्त डॉ. संपदा हिरे, डॉ. योगिता हिरे, सहसचिव राजेश शिंदे, श्रीराम शिरसाट, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पृथ्वीराज मगर, पर्यवेक्षिका श्रीमती सुनिता कुवर, पालक सर्व शिक्षकवृंदाच्या वतीने अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यास महाराष्ट्र राज्य स्काऊट गाईड राज्य कार्यालयाचे सेक्रेटरी श्री. मिलींद दिक्षीत, महाराष्ट्र स्काऊट गाईड राज्य कार्यालयाचे कॉन्टीजन लिडर श्री. गोविंद केंद्रे, नाशिक स्काऊट गाईड कार्यालयाचे जिल्हा संघटक स्काऊट श्रीनिवास माधवराव मुरकुटे, स्काऊट गाईड जिल्हा संघटक कविता समीर वाघ यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. राज्यातून सर्वच स्थरांतून अभिनंदन करण्यात आले. ---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV