
नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)। , आजच्या समाजात वाढत चाललेला मानसिक ताण–तणाव, असुरक्षितता, स्पर्धा आणि मूल्यांची घसरण यामुळे मानसिक नैराश्य मोठ्या प्रमाणात वाढत असून, केवळ वैयक्तिक उपचारांनी नव्हे तर समाजव्यवस्थेत मूलभूत बदल केल्याशिवाय या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ वैज्ञानिक, विचारवंत व लेखक मा. डॉ. अच्युत गोडबोले यांनी केले. महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालय, पंचवटी, नाशिक येथे आयोजित मराठी मानसशास्त्र परिषदेच्या ११ व्या राष्ट्रीय व ३८ व्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ‘शाश्वत समाज विकासासाठी मानसशास्त्र’ या बीजविषयावर ते बोलत होते. डॉ. गोडबोले म्हणाले की, आजचा माणूस सतत धावणाऱ्या जीवनशैलीत अडकलेला असून अपेक्षा, अपयशाची भीती, आर्थिक दबाव, सामाजिक असमानता आणि नातेसंबंधातील दुरावा यामुळे मानसिक ताण–तणाव वाढत आहे. या तणावाचे रूपांतर हळूहळू मानसिक नैराश्यात होत असून, यामागे केवळ वैयक्तिक कमकुवतपणा नसून सामाजिक रचना आणि मूल्यव्यवस्थाही कारणीभूत आहे. मानसिक स्वास्थ्य हा केवळ वैयक्तिक प्रश्न नसून तो सामाजिक प्रश्न असल्याचे स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की, अधिवेशनात युवकांतील वाढती गुन्हेगारी, व्यसनाधीनता, आत्महत्यांचे प्रमाण, कौटुंबिक ताणतणाव, नातेसंबंध, कृत्रिम बुद्धिमत्ता व मानसिक स्वास्थ्य, ‘जेन-झी’ पिढीच्या समस्या, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांचे मानसिक आरोग्य, आनंदी व दीर्घायुष्यासाठी मानसिक व्यवस्थापन, आभासी वास्तवाचा मानसिक व भावनिक परिणाम, शाश्वत समाजविकासासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका, मूल्याधिष्ठित समाजनिर्मिती, संवेदनशीलता, सहअस्तित्व, समता आणि मानवी नात्यांचे जतन या बाबी जोपर्यंत समाजव्यवस्थेचा केंद्रबिंदू होत नाहीत, तोपर्यंत मानसिक आजारांचे प्रमाण कमी होणार नाही. *कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन* या उक्तीप्रमाणे भगवद्गीतेतील हा श्लोक माणसाला फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्तव्य करत राहण्याची प्रेरणा देतो, अर्थात कर्म करत जा, फळाची चिंता करू नकोस असा विश्वास निर्माण झाला पाहिजे. विज्ञान आणि मानसशास्त्र यांचा समन्वय साधत मानवी कल्याणाला प्राधान्य देणे ही काळाची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगाने बदलणाऱ्या जीवनपद्धतीमुळे माणसाचे भावनिक आयुष्य कोलमडत चालले असून, यावर उपाय म्हणून मानसशास्त्राला सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन बनवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. आनंदी, समतोल व शाश्वत समाजनिर्मितीसाठी मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व त्यांनी सविस्तरपणे मांडले. या दोन दिवसीय परिषदेचे अध्यक्ष श. डॉ. गौतमी गवळी, प्रमुख उपस्थिती . डॉ. हरिष पी. आडके, मा. डॉ. डी. एस. मोरे, महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. बी.एस. जगदाळे तसेच मराठी मानसशास्त्र परिषद कार्यकारिणी डॉ. मोहन दिंडोकर अध्यक्ष, डॉ. कालीदास पाटील सचिव, डॉ. रवींद्र शिंदे उपाध्यक्ष, डॉ. जितेंद्रकुमार बेळकर सचिव, डॉ. लक्ष्मण सासणे सहसचिव यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV