
जळगाव, 26 डिसेंबर (हिं.स.) मुलाच्या हव्यासापोटी माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील मोराड येथे घडली असून, चौथ्यांदाही मुलगीच जन्माला आल्याच्या रागातून एका विकृत पित्याने आपल्या अवघ्या तीन दिवसांच्या चिमुरडीची निर्घृण हत्या केल्याची संताप जनक घटना समोर आली असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या अमानवी कृत्यामुळे समाजातील मुला–मुलींच्या भेदाची दाहकता पुन्हा एकदा ठळकपणे समोर आली आहे. कृष्णा लालचंद राठोड (वय २६, रा. मोराड) असे आरोपी पित्याचे नाव असून त्याला यापूर्वी तीन मुली आहेत. चौथ्यांदा मुलगा होईल, या अपेक्षेने तो वाट पाहत होता; मात्र १३ नोव्हेंबर रोजी त्याच्या पत्नीने पुन्हा एका मुलीला जन्म दिला. मुलगा न झाल्याच्या रागातूनच राठोड याने घरात असलेल्या लाकडी पाटाने तीन दिवसांच्या ‘राधिका’ नावाच्या बालिकेच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या गंभीर हल्ल्यात चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पहूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार बाळकृष्ण शिंब्रे यांनी फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तत्काळ हालचाली करत आरोपी कृष्णा राठोड यास त्याच रात्री ८.५१ वाजता अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे करीत आहेत.एका पित्यानेच आपल्या पोटच्या गोळ्याची अशा प्रकारे हत्या केल्याने संपूर्ण तालुक्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर