
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)।
अमरावती शहराच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या पॅरामोटरींग उपक्रमाची सुरुवात येथील प्रसिद्ध हनुमान गढी परिसरात ट्रायल बेसवर करण्यात आली आहे. या साहसी उपक्रमाला पर्यटकांसह स्थानिक नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, येत्या ५ जानेवारीपासून पॅरामोटरींग नियमित स्वरूपात सुरू होणार आहे.या उपक्रमामुळे अमरावतीकरांना आकाशातून शहराचे विहंगम दृश्य पाहण्याचा थरारक व रोमांचक अनुभव घेता येणार आहे. हनुमान गढी परिसरातील नैसर्गिक सौंदर्य, टेकड्या आणि शहराचे विस्तीर्ण दर्शन पॅरामोटरींगच्या माध्यमातून अनुभवता येणार असल्याने अमरावतीचे पर्यटन नकाशावर वेगळे स्थान निर्माण होण्याची शक्यता आहे.आमदार रवि राणा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम अमरावतीत साकार होत आहे. यासंदर्भात त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “अमरावती शहरात पर्यटन आणि साहसी खेळांसाठी मोठी क्षमता आहे. युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि शहरात पर्यटकांची संख्या वाढावी, या उद्देशाने पॅरामोटरींगसारखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.”ट्रायल दरम्यान अनुभवी व प्रशिक्षित पायलट आणि तज्ज्ञ प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली सर्व उड्डाणे घेण्यात आली. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तांत्रिक सुविधा, हेल्मेट, सेफ्टी हार्नेस तसेच अन्य संरक्षक साधनांचा वापर करण्यात आला असून, पुढील काळातही सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाणार आहे.हनुमान गढी परिसरात सुरू झालेल्या या उपक्रमामुळे स्थानिक व्यावसायिक, हॉटेल उद्योग तसेच पर्यटनाशी संबंधित सेवांना चालना मिळणार आहे. साहसप्रेमी युवकांबरोबरच बाहेरील पर्यटकांमध्येही या उपक्रमाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून, अमरावतीकरांना आता पॅरामोटरींगच्या माध्यमातून आकाशात झेप घेण्याचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी