
अमरावती, 26 डिसेंबर (हिं.स.)
नागपुरी गेट पोलिस स्टेशन परिसरातील रहमान नगर येथे पोलिसांनी एका घरावर छापा टाकून ४ तलवारी, २ चाकू जप्त केले. अमीन खान आशिक खान (२३, रहमान नगर, टॉवर लाईन) याला अटक केली असून गुन्हा दाखल केला. नागपूरी गेट पोलिस पथकाने गुरुवारला सकाळी ही मोठी कारवाई केली.
माहितीनुसार, नागपुरी गेट पोलिसांना रहमाननगर परिसरातील आरोपीच्या घरात शस्त्रे लपवल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी अमीन खान आशिक खानच्याघरी छापा टाकला. झडतीदरम्यान, आरोपीच्या घरातून चार तलवारी, एक लोखंडी रॉड आणि दोन स्टील चाकू जप्त करण्यात आले, ज्यांची एकूण किमत ९,००० रुपये आहे. आरोपीविरुद्ध नागपुरी गेट पोलिस स्टेशनमध्ये शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम ४/२५ आणि एम.पी.ओ.सी. कायद्याच्या कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला आणि पोलीस निरीक्षक हनुमंत उरलागोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पंकज गुप्ता यांच्यासह डीबी पथकाचे राजेंद्र पिपळे, मलिक अहमद, इरफान रैलीवाले, प्रवीण धंगेकर, अमर पटेल, सागर पंडित, यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी