
बीड, 26 डिसेंबर (हिं.स.)
संतांनी शुद्ध भक्ती, निरपेक्ष भावना आणि कर्मयोगाचा मार्ग समाजाला दिला. आजही तोच मार्ग जीवनाला योग्य दिशा देतो, असे नाना महाराज कदम यांनी सांगितले. श्री शनिमंदिर देवस्थान येथे सुरू असलेल्या शनी जन्मोत्सवानिमित्त कीर्तनसेवा भक्तिभावात पार पडली या वेळी नाना महाराज कदम बोलत होते. त्यांनी संत परंपरेचे महत्त्व विशद केले.
नाना महाराज यांनी संत नामदेव महाराजांचा 'घालीन लोटांगण...' हा अभंग घेत भक्तीतील प्रेम, समर्पण आणि ईश्वराशी आत्मिक नाते प्रभावीपणे उलगडले. संतांनी जात, पात, लिंगभेद न करता सर्वांना एकत्र आणले. संसारातील जबाबदाऱ्या पार पाडत भक्ती करणे हाच खरा संदेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्म आणि भक्तीचा समन्वय साधत संतांनी समाजाला सदाचार, मानवता आणि समतेचा मार्ग दाखवला. आजच्या धकाधकीच्या जीवनात संतांचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाने प्रामाणिकपणे काम करत भक्तिभाव जपावा, असे आवाहनही त्यांनी केले.
गायनाचार्य वैभव महाराज काकडे आणि संतोष महाराज डोंगरे यांनी भक्तिरसपूर्ण गायन सादर केले. कार्यक्रमास शनिमंदिर देवस्थानचे अध्यक्ष रामनाथ खोड, वारकरी संप्रदायातील भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis