
रत्नागिरी, 26 डिसेंबर, (हिं. स.) : येथील श्रीमती यमुनाबाई खेर ट्रस्ट संचलित सर्वोदय छात्रालयाचा एकविसावा छात्रमित्र मेळावा येत्या रविवारी (दि. २८ डिसेंबर) आयोजित केला आहे. या मेळाव्यात संस्थेच्या वतीने हरिश्चंद्र गीते पुरस्कृत तिसरा सर्वोदय पुरस्कार गुणवंत माजी छात्र रघुवीर रामचंद्र शेलार यांना प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. बा. ना. सावंत रोड येथील सर्वोदय छात्रालयाच्या सभागृहात हा मेळावा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत होणार आहे. पू. अप्पासाहेब पटवर्धन, बाळासाहेब खेर, मोरोपंत तथा तात्यासाहेब जोशी, शामराव तथा अण्णासाहेब पेजे आदींच्या पुण्याईचा वारसा सर्वोदय छात्रालयाला लाभला आहे. शैक्षणिक जीवनातील, छात्रालयातील जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी, आपले स्नेहबंध मजबूत करण्यासाठी माजी छात्रांनी आवर्जून या मेळाव्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. संदीप ढवळ, व्यवस्था समितीचे अध्यक्ष गजानन चाळके आणि सर्वोदय छात्रालय समितीचे अध्यक्ष अरुण जाधव व पदाधिकारी, सहकाऱ्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी