
गडचिरोली, 26 डिसेंबर (हिं.स.)
केवळ पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन (पी.एम.एफ.एम.इ) योजनेचा प्रभावी लाभ घेऊन शेतीपूरक उद्योग उभारल्यास आर्थिक स्थैर्य व स्वावलंबन साधता येते, हे माळदा येथील प्रगतशील शेतकरी श्री. कृष्णा भागरथी भुरकुरीया यांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. पी.एम.एफ.एम.इ. योजनेअंतर्गत सुरू केलेला त्यांचा मसाले प्रक्रिया उद्योग आज ग्रामीण भागातील इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
श्री. भुरकुरीया यांच्याकडे अवघी २.०० हेक्टर वडिलोपार्जित शेती आहे. मोठ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केवळ शेतीवर करणे कठीण जात असल्याने ते पर्यायी उत्पन्नाच्या शोधात होते. सन २०२२–२३ मध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने गावात आयोजित बैठकीत कृषी सहाय्यक श्री. पी. जी. मेश्राम यांनी पी.एम.एफ.एम.इ योजनेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनामुळे प्रेरित होऊन शेतीला पूरक असा मसाले प्रक्रिया उद्योग उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि स्वावलंबनाकडे त्यांचा प्रवास सुरू झाला.
कृषी सहाय्यकांच्या तांत्रिक मार्गदर्शनासह जिल्हा संसाधन व्यक्तीशी (DRP) संपर्क साधून सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत त्यांच्या प्रकल्पासाठी कर्ज मंजूर झाले. एकूण ९० हजार इतक्या प्रकल्प खर्चामध्ये त्यांनी ₹८,००० स्वतःचे भांडवल गुंतवले. फेब्रुवारी २०२३ पासून प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात झाली.
या युनिटमध्ये सध्या मिरची पावडर, विविध प्रकारचे मसाले, पीठ (आटा) तसेच डाळी तयार केल्या जात असून, तयार उत्पादनांची विक्री माळदा गाव व धानोरा येथील स्थानिक बाजारपेठेत केली जाते. या उद्योगातून त्यांना वार्षिक अंदाजे ₹४०,००० पर्यंतचे अतिरिक्त उत्पन्न मिळत असून, कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागविण्यास मोठा आधार निर्माण झाला आहे. यासोबतच स्थानिक पातळीवर कच्च्या मालाचे मूल्यवर्धन होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे.
“या योजनेमुळे माझा आत्मविश्वास वाढला असून माझे राहणीमान उंचावले आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता इतर शेतकऱ्यांनीही अशा शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे उद्योग सुरू करावेत आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे,” असे आवाहन श्री. कृष्णा भुरकुरीया यांनी केले.
दरम्यान, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्रीमती प्रिती हिरळकर यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांनी मूल्यवर्धनावर भर देणे आवश्यक आहे. श्री. कृष्णा भुरकुरीया यांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड देऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी दिली आहे. इतर तरुण शेतकऱ्यांनीही पी.एम.एफ.एम.इ. योजनेचा लाभ घेऊन स्वतःचे प्रक्रिया युनिट उभारावे; त्यासाठी जिल्हा कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करण्यास कटिबद्ध आहे.”
शासनाचे मार्गदर्शन, विभागीय सहकार्य आणि शेतकऱ्यांची उद्यमशीलता यांची सांगड घातल्यास ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती व उत्पन्नवाढ साध्य होऊ शकते, याचे हे यशस्वी व प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Milind Khond