
सिंधुदुर्ग, 26 डिसेंबर, (हिं. स.) : आचरे (मालवण) येथील साने गुरुजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर गुरुजी यांना अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचा मानाचा केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
कोल्हापूर येथे झालेल्या निवड मंडळाने एकमताने ठाकूर गुरुजी यांची निवड केली. अखिल भारतीय साने गुरुजी केंद्रीय समितीचे अध्यक्ष हसन देसाई (कोल्हापूर), सचिव सुनील पुजारी (सोलापूर) यांनी आज कोल्हापूर येथे जाहीर केले. दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून पुरस्काराचे वितरण बेळगाव येथे 11 जानेवारी रोजी कथामालेच्या राष्ट्रीय अधिवेशनात होणार आहे.
कथामाला संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकरांच्या ग्रामीण भागात काम करणाऱ्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याचा आज गौरव झाला आहे, अशा शब्दांत अ. भा. साने गुरुजी कथामालेचे कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील यांनी ठाकूर यांचे अभिनंदन केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी