
हिंगोली, 26 डिसेंबर (हिं.स.)।
भारताच्या गौरवशाली इतिहासातील वीर बालकांच्या शौर्य व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी 26 डिसेंबर रोजी ‘वीर बाल दिवस’ निमित्त हिंगोली येथील श्री स्वामी समर्थ बालगृह (खानापूर चित्ता) तसेच सरस्वती मुलींचे निरीक्षण गृह व बालगृह (सावरकर नगर) येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान जिल्हा महिला व बाल विकास विभागातील अधिकारी व मान्यवरांनी बालकांशी संवाद साधून वीर बालकांचा शौर्याचा वारसा, त्यांचा त्याग व उदात्त मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून मुला-मुलींना वीर बालकांचे ऐतिहासिक महत्त्व व त्यांचे बलिदान समजावून सांगण्यात आले. या उपक्रमामुळे बालकांमध्ये देशभक्ती, नैतिक मूल्ये व आत्मविश्वास वृद्धिंगत होण्यास मदत झाली.
बालकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निबंध, चित्रकला व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कॅरम, लगोरी यांसारख्या क्रीडा स्पर्धांमधून बालकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis