देवरूखचे चित्रकार विष्णू परीट यांच्या जलरंग चित्राची देशपातळीवर निवड
रत्नागिरी, 26 डिसेंबर, (हिं. स.) : गेली ४० वर्षे जलरंगात काम करणारे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे (देवरूख) येथील प्रथितयश चित्रकार विष्णू परीट यांच्या जलरंग चित्राची निवड आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे आयोजित चित्र प्रदर्शनासाठी केली आहे. आर्ट सोसायटी
देवरूखचे चित्रकार विष्णू परीट यांच्या जलरंग चित्राची देशपातळीवर निवड


रत्नागिरी, 26 डिसेंबर, (हिं. स.) : गेली ४० वर्षे जलरंगात काम करणारे संगमेश्वर तालुक्यातील सोनवडे (देवरूख) येथील प्रथितयश चित्रकार विष्णू परीट यांच्या जलरंग चित्राची निवड आर्ट सोसायटी ऑफ इंडियातर्फे आयोजित चित्र प्रदर्शनासाठी केली आहे.

आर्ट सोसायटी ऑफ इंडिया ही देशस्तरावरील संस्था कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी देशातील विविध भागात अनेक उपक्रम राबवत असते. देशातील चित्रकारांकडून चित्र-शिल्प यांची छायाचित्रे मागवून त्यातून उत्तम कलाकृतींची निवड केली जाते. या सर्व कलाकृतींचे प्रदर्शन दरवर्षी मुंबईत भरवले जाते. नवीन वर्षात हे प्रदर्शन भरणार असून यावर्षी या प्रदर्शनाचे १०८ वे वर्ष आहे. या प्रदर्शनात विष्णू परीट यांच्या जलरंग कलाकृतीची निवड झाली आहे.

विष्णू परीट सोनवडे विद्यामंदिरात ३६ वर्षे कलाशिक्षक होते. मूळ इचलकरंजीजवळच्या कबनूर येथील विष्णू परीट यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळत असताना छंद म्हणून जलरंगात निसर्गचित्रे रेखाटण्यास सुरुवात केली. दररोज एक याप्रमाणे कलाकृती साकारत असताना त्यांनी जलरंगावर प्रभुत्व मिळवले.

गतवर्षी त्यांच्या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीतर्फे उत्कृष्ट कलाकृतीचे पारितोषिक राज्यपालांच्या हस्ते मिळाले. आर्ट सोसायटी ऑफ इंडियाने विष्णू परीट यांच्या कलाकृतीची प्रदर्शनासाठी निवड केल्यानंतर ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, सह्याद्री कलामहाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, इचलकरंजी कला महाविद्यालयाचे प्राचार्य पाटील, चित्रकार अमित सुर्वे, रूपेश सुर्वे, प्रदीप देडगे, अवधूत खातू, विक्रांत बोथरे, मिरज कला महाविद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत होळकर, चित्रकार मनोज सुतार, श्रीरंग मोरे, दत्ता हजारे, सतीश सोनवडेकर, विक्रांत दर्डे, प्राध्यापक धनंजय दळवी यांनी श्री. परीट यांचे अभिनंदन केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande