
नाशिक, 26 डिसेंबर (हिं.स.)। , : मकरसंक्रांत आणि पतंगोत्सवाचे अतुट नाते आहे. नाशिक जिल्ह्यात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र हा उत्सव साजरा करताना तो आपल्यासह इतरांसाठीही सुरक्षित राहील याची प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी करीत नाशिककरांना येणाऱ्या नववर्षासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. जिल्हाधिकारी श्री. प्रसाद यांनी जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांना नववर्ष आणि मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, नववर्षातील पहिला सण म्हणजे मकरसंक्रांत होय. मकर संक्रांत आणि तीळगुळाबरोबरच पतंगोत्सवाचेही नाते घट्ट आहे. तीळगुळाने स्नेहाचा गोडवा आणि आरोग्याची संपन्नता वाढते, तर पतंग उडविण्यामुळे तन आणि मनाची ऊर्जा द्विगुणित होते. मात्र, पतंगोत्सव साजरा करताना आपल्यासह अन्य व्यक्ती, पशु-पक्षी सुरक्षित राहतील याचीही काळजी घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पतंगाच्या मांजामुळे अपघात होत आहेत. वाहन चालकांचा गळा कापला जाणे, खोलवर जखमा होण्याबरोबरच काही जणांना प्राणासही मुकावे लागल्याच्या घटना घडतात. पतंग उडविण्यात दंग राहिल्याने उंच छतावरून पडून जखमी होणे किंवा प्राणाला मुकावे लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. पतंगाचा मांजा जसा मानवासाठी धोकेदायक आहे, तसाच तो पक्ष्यांसाठी जीवघेणा आहे. त्यांचे पंख कापले जाणे, पायांना जखमा होणे वेळप्रसंगी या मुक्या पक्ष्यांना मांजापायी जीवही गमवावा लागतो. या सर्व पार्श्वभूमीवर पतंगोत्सव आनंददायी आणि अपघात विरहित करण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी नॉयलॉन मांजाचा वापरच करू नका. यामुळे स्वत:सह इतरांना जखमी होण्यापासून वाचविता येईल. रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्यावर पतंग उडवू नका, झाडांजवळ पतंग उडवू नका. पतंग शक्यतो जमिनीवरून, मैदानावरून उडवा. यामुळे पडण्याचा किंवा जखमी होण्याचा धोका नसतो. वीज तारांजवळ पतंग उडवू नका, सूर्यकिरणांच्या दिशेने पाहून पतंग उडवीत असाल, तर डोळ्यांच्या सुरक्षेसाठी गॉगलचा जरूर वापर करावा. पतंग उडवून झाल्यावर पतंग, मांजाचे तुकडे उचलून त्यांची सुरक्षितरित्या विल्हेवाट लावण्याचेही आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी नाशिककरांना केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV