शिक्षणातील जाचक अटीविरुद्ध देवरूख येथे शनिवारी निर्धार सभा
रत्नागिरी, 26 डिसेंबर, (हिं. स.) : शिक्षणातील जाचक अटीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी देवरूख येथे शनिवारी, दि. २७ डिसेंबर रोजी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे. देवरूख येथील माटे-भोजने सभागृहात सकाळी ११ वाजता बैठक सुरू होईल
शिक्षणातील जाचक अटीविरुद्ध देवरूख येथे शनिवारी निर्धार सभा


रत्नागिरी, 26 डिसेंबर, (हिं. स.) : शिक्षणातील जाचक अटीविरुद्ध आवाज उठविण्यासाठी देवरूख येथे शनिवारी, दि. २७ डिसेंबर रोजी प्राथमिक शिक्षक समितीतर्फे निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे.

देवरूख येथील माटे-भोजने सभागृहात सकाळी ११ वाजता बैठक सुरू होईल. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ (RTE ACT 2009) नुसार वस्तीपासून १ किलोमीटरच्या आत पहिली ते पाचवीचे शिक्षण आणि तीन किलोमीटरच्या आत आठवीपर्यंतचे शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे. मात्र मार्च २०२४ च्या संचमान्यता शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास बालकाच्या शिक्षणाच्या मूलभूत हक्कावर गदा येणार आहे. याविरुद्ध आवाज उठविण्यासाठी देवरूख येथे ही निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीला संगमेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच व सदस्य, सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी, सर्व मुख्याध्यापक व सहशिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या संगमेश्वर तालुका शाखेने केले आहे.

ग्रामीण भागातील बहुसंख्य शाळांमध्ये पहिली ते पाचवी इयत्ता असणाऱ्या शाळांमध्ये एक नियमित शिक्षक तर पहिली ते सातवी-आठवीच्या शाळांमध्ये दोन नियमित शिक्षक व एखादा कंत्राटी शिक्षक कार्यरत राहतील. परिणामी शाळा असूनही पुरेशा शिक्षकांअभावी शिक्षण नाही, अशी परिस्थिती उद्भवू शकते. यासंदर्भात साकल्याने विचार करून मार्ग काढणे आवश्यक आहे. यासाठीच देवरूख येथे सभा आयोजित करण्यात आली आहे.

सभेत १३ डिसेंबर रोजी देवरूखच्या कुणबी भवनात सभेचा वृत्तांत कथन करणे, शासनाच्या १५/०३/२०२४ च्या संचमान्यता शासननिर्णयाची माहिती देणे, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षण बचाव संघर्ष समिती स्थापन करणे, जिल्हा परिषद शाळांतील शिक्षण बचाव लढ्याची पुढील दिशा ठरविणे अशा स्वरूपाचे कामकाज होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande