
ठाणे, 26 डिसेंबर, (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आज डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. निवडणूक उपायुक्त उमेश बिरारी यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना सोपविण्यात येणाऱ्या कामकाजाची माहिती दिली. यावेळी उपायुक्त जी.जी गोदेपुरे उपस्थित होते.
लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकाकरीता उपलब्ध असलेल्या मशीन मध्ये कोणता फरक आहे हे सांगितले, या मध्ये व्हीव्हीपॅट मशीन नाही. मॉकपोल प्रत्यक्ष मतदानाच्या 1 तास आधी सुरू करणे. बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांची जोडणी कशी करावी, END बटनचे महत्त्व तसेच
पथकांची रचना याबाबत मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणात ईव्हीएम मशीनची रचना, कार्यपद्धती, मतदानाच्या दिवशी घ्यावयाची खबरदारी, मॉक पोल प्रक्रिया, सील लावण्याची पद्धत तसेच मतदानानंतर मशीन सुरक्षितरीत्या स्ट्रॉंग रूममध्ये जमा करण्याची प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तात्काळ कोणती कार्यवाही करावी, याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, निर्भय व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने या प्रशिक्षणात निवडणूक कायदे, आदर्श आचारसंहिता, मतदान प्रक्रियेतील जबाबदाऱ्या, मतमोजणीपूर्व व मतमोजणीदरम्यान घ्यावयाच्या खबरदाऱ्या, तसेच तक्रार निवारण यंत्रणा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास क्षेत्रीय अधिकारी व संबंधित कर्मचारी संख्येने उपस्थित होते. प्रशिक्षणामुळे आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रभावीपणे आणि नियमानुसार पार पाडण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर