''ग्लोबल कृषी महोत्सव'' येत्या ८ ते ११ जानेवारीदरम्यान
पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)। शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे संशोधन आणि कृषी ज्ञानाची दारे उघडणारा ''''ग्लोबल कृषी महोत्सव २०२६'''' येत्या ८ ते ११ जानेवारीदरम्यान नारायणगाव येथे रंगणार आहे. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद
''ग्लोबल कृषी महोत्सव'' येत्या ८ ते ११ जानेवारीदरम्यान


पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)।

शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, जागतिक दर्जाचे संशोधन आणि कृषी ज्ञानाची दारे उघडणारा ''ग्लोबल कृषी महोत्सव २०२६'' येत्या ८ ते ११ जानेवारीदरम्यान नारायणगाव येथे रंगणार आहे. ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने आयोजित या भव्य प्रदर्शनाच्या महामंडपाचे भूमिपूजन ग्रामोन्नती मंडळाचे विश्वस्त प्रकाश पाटे यांच्या हस्ते पार पडले.या महोत्सवामुळे जुन्नर-आंबेगाव पट्ट्यासह राज्यातील शेतकऱ्यांसाठी प्रगतीचे एक नवीन पर्व सुरू होणार आहे. या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांनी, “हा ग्लोबल कृषी महोत्सव शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि बाजारपेठेशी थेट जोडणारा मैलाचा दगड ठरेल,” असा विश्वास व्यक्त केला. या प्रदर्शनात हवामान आधारित भाजीपाला व्यवस्थापन, ऊस व केळी पिकातील एआय आधारित शेती व नैसर्गिक शेती, देशी गोवंश याबाबत चर्चासत्र, शेळीपालन, प्रक्रिया उद्योग, कांदा-टोमॅटो मूल्यवर्धन आणि उत्पादन ते विक्री या साखळीवर विशेष परिसंवाद होणार आहे. हायटेक शेती तंत्रज्ञान आणि करार शेती यावरही सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. एक लाखाहून अधिक शेतकरी या प्रदर्शनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.या महोत्सवाला भारतीय कृषी संशोधन परिषद, नाबार्ड, आत्मा कृषी विभाग, जिल्हा सहकारी बँक, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, भीमाशंकर व विघ्नहर सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्हा परिषद, बँक ऑफ इंडिया यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. महोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी नेक्सस इव्हेंट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या प्रदर्शनाच्या अधिक माहितीसाठी प्रा. राहुल घाडगे (९४२२०८००११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केव्हीकेचे प्रमुख डॉ. प्रशांत शेटे यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande