
रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : चांदोर (ता. रत्नागिरी) गावात महिला बचत गटाने नवा आदर्श लोकांपुढे ठेवला आहे. श्रमदानातून अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने नदीवर वनराई बंधारे बांधले आहेत.
चांदोरचे उपसरपंच सूर्यकांत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत लोकसहभाग आणि श्रमदानातून हे बंधारे बांधण्यात आले आहेत. चांदोर उगवतीवाडी व चिंचवाडी येथील महिला बचत गटातील महिलांनी तसेच तालुक्यातील चांदोर ग्रामपंचायत हद्दीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम झाले. लोकसहभागातून चांदोर उगवतीवाडी व चिंचवाडी येथील महिला बचतगटातील महिलांनी तसेच नेहा तांबे यांच्या नियोजनातून वनराई बंधारे बांधण्यात आले.
बंधारे बांधण्यासाठी दगडमाती, रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या यांचा वापर करून अतिशय कमी खर्च करून हा बंधारा बांधण्यात आला. वनराई बंधारा परिसरात भूजल पातळी वाढण्यास मदत होईल शिवाय विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे पाणीपुरवठा सुरळीत राहण्यासाठी मदत होईल तसेच आजूबाजूच्या जमिनीत ओलावा टिकून राहील. या बंधाऱ्यांमुळे पाणीटंचाईला आळा बसेल व महिलांचा, जनावरांचा पाण्याचा प्रश्नही सुटेल. हे बंधारे बांधण्यासाठी बचतगटातील महिलांना ग्रामस्थांचेही सहकार्य मिळाले.
अतिशय कमी खर्चात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यांमुळे पाणी अडवल्यामुळे त्याचे अनेक फायदे स्थानिकांना मिळणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी