मुंबई–गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात ११ जानेवारीला संगमेश्वरात रास्ता रोको
रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात येत्या ११ जानेवारीला संगमेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे. जून २०२५ पर्यंत मुंबई–गोवा महामार्ग पूर्ण होईल, अशी वारंवार दिली जाणारी आश्वासने के
मुंबई–गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात ११ जानेवारीला संगमेश्वरात रास्ता रोको


रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या अपूर्ण कामाविरोधात येत्या ११ जानेवारीला संगमेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार आहे.

जून २०२५ पर्यंत मुंबई–गोवा महामार्ग पूर्ण होईल, अशी वारंवार दिली जाणारी आश्वासने केवळ कागदावरच राहिली असून प्रत्यक्षात महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण आहे. मुदत पूर्ण होण्याच्या अनेक तारखा संपूनही महामार्ग पूर्ण न झाल्याने कोकणवासीयांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेली कामे, निकृष्ट दर्जाचे रस्ते, अपघातांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि नागरिकांचे होणारे हाल लक्षात घेता आता कोकणवासीयांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जनआक्रोश समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन पुकारण्यात आले आहे.

हे आंदोलन ११ जानेवारी रोजी सकाळी १०. वाजता संगमेश्वर एसटी बसस्थानकासमोर सुरू होणार आहे. महामार्गाच्या संथ कामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले असून अनेक अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तरीही ठेकेदार कंपन्या आणि संबंधित यंत्रणांकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.

या आंदोलनाद्वारे महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करावे, खोट्या डेडलाइन देणे थांबवावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande