
सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। आयारामांना उमेदवारी दिल्यास अन्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजप निष्ठावंतांच्या पाठीशी उभे राहू, अशी भूमिका जाहीर करून सोलापुरातील आमदारद्वय देशमुखांनी सूचक पद्धतीने भाजपलाच आव्हान दिले. अर्थात, या आमदारद्वयांचा रोख पूर्णतः पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीस तसेच अन्य पक्षांतील लोकांना भाजपमध्ये घेण्यास विरोध करणारा आहे.महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपातील अंतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नसून गेल्या तीन दिवसांपासून पालकमंत्री जयकुमार गोरे हे सक्रिय झाले आहेत. त्यामुळे भाजपचे आ. विजयकुमार देशमुख आणि आ. सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. त्याबाबत आ. विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी आ. सुभाष देशमुख यांच्यासोबत बैठक झाली.दरम्यान, आ. विजयकुमार देशमुख यांनी भाजपातील निष्ठावंतांवर अन्याय होऊन देणार नाही. जे कार्यकर्ते भाजपचे पूर्वीपासून काम केले आहेत, ते अन्य पक्षातून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवित असल्यास त्यांना मदत करू, अशी भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी अटळ असल्याचे संकेत मिळत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड