
अकोला, 27 डिसेंबर (हिं.स.)। अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत बिघाड झाल्याचं चित्र स्पष्ट होत आहे.आज जागावाटपाच्या मुद्द्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने ही बैठक निष्फळ ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप 55 शिवसेना एकनाथ शिंदे 15 आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( अ.प ) 10 जागांवर निवडणूक लढणार असल्याचा फार्मूला जवळपास नक्की झाला होता.या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) चे नेते गोपीकिशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी भेट घेतली.या भेटीत दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे समजते.सूत्रांच्या माहितीनुसार, अकोला महापालिकेची निवडणूक फिफ्टी-फिफ्टीच्या ( शिवसेना + राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार) फार्मूल्यावर लढण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे मात्र अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचा दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हंटलं आहे.मात्र महायुती संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप झालेला नसून चर्चा सुरूच असल्याचे इंद्रनील नाईक , आमदार अमोल मिटकरी आणि एकनाथ शिंदे शिवसेना चे नेते गोपीकिशन बाजोरिया यांनी स्पष्ट केले आहे.दरम्यान, या घडामोडींमुळे अकोला महायुतीतील राजकीय समीकरणे पुन्हा एकदा चर्चेत आली असून पुढील काही तासांत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे