
रत्नागिरी, 27 डिसेंबर, (हिं. स.) : वेरवली (ता. लांजा) येथील श्रीराम विद्यालय व तु. पुं. शेट्ये कनिष्ठ महाविद्यालय आणि का. रा. कोळवणकर यामाहा ट्रेनिंग स्कूलने आयोजित श्री. शैलेश रमेश डोळस विद्यानगरी नामकरण सोहळ्यानिमित्त आयोजित राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत देवरूखचे विश्वविक्रमी रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांनी प्रथम क्रमांक मिळविला.
स्पर्धेसाठी पोर्ट्रेट (व्यक्तिचित्र) हा विषय आयोजकांनी दिला होता. या व्यक्तित्वांमध्ये भारतीय खेळाडू, सिनेकलाकार, नाट्यकलाकार, चित्रकार, शास्त्रज्ञ, राष्ट्रपुरुष, प्रसिद्ध राजकारणी व देवीदेवता यापैकी एका विषयाची निवड करायची होती. विलास रहाटे यांनी जागतिक दर्जाचे भारतीय शिल्पकार स्व. राम सुतार यांच्या जीवनावर आधारित ३x४ फूट आकारात आकर्षक रांगोळी साकारली. ती त्यांनी १२ तासात पूर्ण करून यश प्राप्त केले.
श्री. रहाटे यांनी आपल्या कलाकारीतून 'भारताचे लोहपुरुष' सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू ऑफ युनिटी हा स्व. राम सुतार यांनी घडविलेल्या जगप्रसिद्ध पुतळ्याची प्रतिकृती आणि स्व. राम सुतार यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या तीन छबी उत्तमरीत्या साकारल्या. श्री. रहाटे यांना रोख ११,००० रुपये, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी