
पुणे, 27 डिसेंबर (हिं.स.)। गेल्या साडेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुणे महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होऊन दोन दिवस उलटले तरीही उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. उमेदवारांनी अर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे. केवळ 8 जणांनी उमेदवारी अर्ज भरले, तर इच्छुकांनी मात्र विक्रमी अर्जखरेदी केली आहे. अर्जखरेदीसाठी प्रचंड उत्साह आणि स्पर्धा असून, गेल्या तीन दिवसांत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तब्बल 9,101 नामांकन अर्ज खरेदी केले आहेत. नामांकन दाखल करण्यासाठी चार दिवस शिल्लक असून, अर्ज विक्रीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. निकाल 16 जानेवारीला जाहीर होणार आहेत. शहरातील 41 प्रभागांमधून 165 नगरसेवक निवडण्यासाठी शहरातील 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु