
सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)।
ग्रामीण भागात राहणाऱ्या कॅन्सरग्रस्त रुग्णांना जिल्हा आरोग्य विभागातर्फे तात्काळ उपचार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे आरोग्य उपसंचालक भगवानराव पवार यांनी दिली.आरोग्य विभागातर्फे ग्रामीण भागातील रुग्णांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य उपसंचालक पवार यांनी साेलापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहात बैठक घेतली.
या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्यासह ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पवार यांनी आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमाचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांची संवाद साधताना त्यांनी आपल्या भेटीचा उद्देश विशद केला.
आरोग्य विभागामार्फत ग्रामीण भागात विविध योजना राबविण्यात येत आहेत. सोलापूर जिल्हा आरोग्य विभागाने चांगले काम केले आहे. यापूर्वी ग्रामीण भागातील महिला व शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती. त्यात काही संशयित कॅन्सरग्रस्त रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांना तात्काळ उपचार करण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येणार आहे. त्यासाठी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा घेण्यात येत आहे. ग्रामीण रुग्णालयातील ही उपचार यंत्रणा गतिमान करण्यासाठी पाहणी दौरे केले आहेत. या कर्मचाऱ्यांना काही अडचणी येतात का याबाबतही माहिती घेतली जात आहे असे त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड