
सोलापूर, 27 डिसेंबर (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हावर लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी बैठक मोहोळ येथे मोठ्या उत्साहात पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता संघटनात्मक बांधणी, निवडणूक तयारी आणि इच्छुक उमेदवारांच्या भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हावर लढवण्यासाठी सज्ज राहण्याचे स्पष्ट आवाहन केले. या बैठकीत माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, मोहोळ व माळशिरस या तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र आढावा बैठका घेण्यात आल्या. प्रत्येक तालुक्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारांचा कल याचा आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून मागणी अर्ज स्वीकारण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड