
बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)।
आनंदगाव (ता. केज) येथील येडेश्वरी साखर कारखान्याने सन २०२५-२६ या चालू गळीत हंगामात अवघ्या ५४ दिवसांत तब्बल चार लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. त्याचबरोबर डिस्टिलरीत मोठी झेप घेतली असून, जवळपास २ कोटी युनिट वीजनिर्मिती केली आहे. सध्या कारखान्याचा बारावा गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे. नियोजनबद्ध व्यवस्थापनामुळे गाळपाचे उद्दिष्ट वेगाने साध्य होत आहे. अशी माहिती कारखान्याचे चेअरमन खासदार बजरंग सोनवणे यांनी दिली.
येडेश्वरी साखर कारखान्याचा सध्या बारावा गळीत हंगाम सुरू आहे. दररोज सरासरी सुमारे ९ हजार टन ऊस गाळप होत आहे. शेतकऱ्यांच्या
ऊसाचे वेळेवर आणि अडथळेविना गाळप होत आहे. गळीत हंगामाच्या सुरुवातीपासूनच काटेकोर नियोजन, यंत्रसामग्रीची तत्पर देखभाल आणि कामगारांच्या नियोजनामुळे गाळपाचा वेग कायम ठेवण्यात कारखाना प्रशासनाला यश आले आहे. ऊस गाळपाबरोबरच कारखान्यांतर्गत कार्यरतअसलेला २६ मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्पही प्रभावीपणे सुरू आहे. आजअखेर या प्रकल्पातून एकूण १ कोटी ९३ लाख ६४ हजार २०० युनिट वीज निर्मिती करण्यात आली आहे.
त्यापैकी ७२ लाख ५४ हजार ९०० युनिट वीज महावितरण कंपनीला निर्यात (एक्सपोर्ट) करण्यात आली आहे. त्यामुळे कारखान्याला अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे. ऊर्जानिर्मिती क्षेत्रातही येडेश्वरी साखर कारखान्याने आपली क्षमता सिद्ध केली आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis