
सोलापूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।सध्या माढा परिसरात विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी दाखल झाले असून येथील रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या खाजगी शेततळ्यात, माढा-शेटफळ रस्त्यालगतच्या गालिशाबाबा तळ्यामध्ये व माढेश्वरी मंदिरालगतच्या मनकर्णा नदीमध्ये युरोपियन बदक मोठ्या प्रमाणात विहार करताना दिसून आले.
थंडीच्या दिवसात पृथ्वीच्या विविध भूखंडांतून बदलत्या हवामानानुसार अनेक जीव स्थलांतर करतात. यामध्ये सर्वात लांब पल्ल्याचे स्थलांतर पक्षीच करतात. युरोप खंडातील अनेक देशांना ओलांडून हजारो मैलांचा प्रवास करत, हिंदुकुश पर्वत पार करून व सिंधू नदीचे खोरे ओलांडून भारतात येणाऱ्या या बदकांना टफ्टेड पोचर्ड तर मराठीमध्ये शेंडीबदक म्हणतात. महाराष्ट्रीयन आदिवासी भाषांमध्ये या बदकांना 'बाड्डा' म्हटले जाते.
या पक्षांचा रहिवास मुख्यतः पाणथळ प्रदेशाभोवती असतो. युरोप खंडात हिवाळ्यात जेव्हा हिमवर्षा सुरू होते व पाणथळ प्रदेश गोठून असह्य थंडी सुरू होते तेव्हा हे पक्षी थंडीचा कमी दाब असलेल्या दक्षिणी व पौर्वात्य जगताकडे अन्नाच्या शोधात पाणथळ प्रदेशांनी स्थलांतर करतात. भारतात या पक्षांचे आगमन नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला होऊ लागते व ते एप्रिल महिन्यापर्यंत इथेच राहतात. उन्हाळा सुरू होताच ते पुढे मार्गक्रमण करतात. या पक्षांचे मुख्य खाद्य पाणथळ भूभागातील शेवाळ, जलीय किटक व मासे हे असून ते केवळ पाणथळ भागांतच मुक्काम करतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड