
बीड, 28 डिसेंबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्यात हमीभावाने सोयाबीन खरेदीची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. शासनाने यंदा सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ५३३८ रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तरी नाफेडकडून वेळेत खरेदी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल खासगी व्यापाऱ्यांना ३५०० ते ४२०० रुपयांदरम्यान विकावा लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. आतापर्यंत २२,७०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे, पण खरेदी केवळ ६, ३२६ शेतकऱ्यांचीच झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार,
गतवर्षीही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी केवळ सुमारे ६० टक्के शेतकऱ्यांचीच हमीभावाने सोयाबीन खरेदी झाली होती. उर्वरित शेतकऱ्यांना नंतर कमी दरात सोयाबीन विकण्याची वेळ आली होती. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात सोयाबीन खरेदीसाठी एकूण ४४ केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. मात्र सध्या केवळ ४० केंद्रांवर नोंदणी सुरू आहे. प्रत्यक्षात फक्त २८ केंद्रांवरच खरेदी प्रक्रिया चालू आहे. जिल्ह्यात एकूण २२,७०४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. नाफेडकडून १२,३५३ शेतकऱ्यांना एसएमएस पाठवण्यात आले. प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत केवळ ६,३२६ शेतकऱ्यांचीच १,३४, २३८ क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली आहे.
नाफेडकडून सोयाबीनसोबत मूग आणि उडीद खरेदीही सुरू आहे. मात्र या पिकांना शेतकऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मूग विक्रीसाठी केवळ ६२, तर उडीद विक्रीसाठी १,९८१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
बीड जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. ३० ऑक्टोबरपासून २०२५ पासून ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. ही सुरू नोंदणी ३० डिसेंबरपर्यंत करता येणार आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis