
अमरावती, 28 डिसेंबर (हिं.स.)
महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांमध्ये अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. पक्षाकडून मिळणारा अधिकृत 'एबी' फॉर्म जोपर्यंत हाती येत नाही, तोपर्यंत उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. शनिवारीसुद्धा हातांच्या बोटावर मोजण्याइतकेच नामांकन दाखल करण्यात आले.
महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून गणला जाण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याकडे 'एबी' फॉर्म सादर करणे अनिवार्य असते. हा फॉर्म म्हणजे पक्षाने संबंधित व्यक्तीला दिलेल्या अधिकृत उमेदवारीची ग्वाही असते. तब्बल तीन वर्ष नऊ महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्येएका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यासोबतच मोठ्या प्रमाणात या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्यांची संख्या अधिक दिसून येत आहे. त्यामुळे पक्षांतर्गत बंडखोरी रोखण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी अद्याप कोणालाही 'एबी' फॉर्म दिलेले नाहीत. मंगळवारपासून (ता. २३) नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. नामांकन दाखल करण्यापेक्षा नामांकन उचलणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तिसऱ्या दिवशी दोन हजारापेक्षा अधिक नामांकनाची उचल करण्यात आली. त्या तुलनेत मात्र दहा ते बारा नामांकन दाखल झाले त्यामध्य ही अपक्ष अधिक आहेत. आता नामांकन दाखल करण्यासाठी केवळ दोन दिवसांचा अवधी उरला आहे. या दोन दिवसात सर्वाधिक नामांकन दाखल होणार असल्याने महापालिका निवडणुकीकरिता तयार करण्यात आलेल्या सातही झोन कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढणार आहे.
...तर नामांकन रद्द होण्याची भीती
▲ जर अपक्ष किंवा पक्षाच्या नावावर अर्ज केला आणि ऐनवेळी 'एबी' फॉर्म मिळाला नाही, तर त्यांचे नामांकन तांत्रिक अडचणीत येऊ शकते, अशी इच्छुकांना भिती आहे. एकीकडे जागा वाटपासाठी राजकीय पक्षांमध्ये चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. कुठल्या प्रभागात कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढणार हे अद्याप ठरलेले नाही. जागावाटप निश्चित झाल्यानंतर कुणाला उमेदवारी द्यायची, हे स्पष्ट होते. त्यामुळे एबी फॉर्म देण्या संदर्भातही पक्षांतर्गत हालचाली सुरू आहे, तर दुसरीकडे कुणाचे तिकीट कापले जाईल व कुणाला उमेदवारी मिळेल, याबाबतही संभ्रम आहे. एखाद्या पक्षाने उमेदवारी दिली नाही तर दुसऱ्या पक्षामध्ये जाण्यासाठीसुद्धा इच्छुक उमेदवार तयार आहेत. नामांकन दाखल करताना एखाद्या पक्षाचे नाव लिहिले आणि दुसऱ्या पक्षाचा एबी फॉर्म मिळाला तर नामांकन रद्द होण्याची भीती असते. त्यामुळे इच्छुक उमेदवार वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहे.
राजकीय पक्षांना बंडखोरीची भीती
ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, ते बंडखोरी करून दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात किंवा अपक्ष अर्ज भरू शकतात. ही बंडखोरी थोपवण्यासाठी राजकीय पक्षातर्फे 'एबी' फॉर्मचे वितरण अत्यंत सावधगिरीने केले जाणार आहे. रविवारच्या सुटीनंतर नामांकन दाखल करण्यासाठी सोमवार व मंगळवार हे शेवटचे दोन दिवस आहेत. या दोन दिवसात नामांकन दाखल करणाऱ्यांची संख्या निश्चितच अधिक राहणार आहे तर दुसरीकडे काही उलटफेर होण्याचे संकेत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी