
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.)।
सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर लोकशाही प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढावा, मतदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण व्हावी तसेच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने ‘हॅपी स्ट्रीट’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यावर हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. सकाळच्या प्रसन्न वातावरणात आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ नागरिक, युवक-युवती, महिला, विद्यार्थी तसेच विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली ‘हॅपी स्ट्रीट’ हा उपक्रम राबविण्यात आला.
हॅपी स्ट्रीट’ उपक्रमांतर्गत नागरिकांसाठी चालणे, योगासन, व्यायाम, मुक्त संवाद यांसह मतदान जनजागृतीवर भर देण्यात आला. लोकशाही व्यवस्थेत मतदानाचे महत्त्व, प्रत्येक मतदाराची जबाबदारी, तसेच मतदानाच्या माध्यमातून सक्षम व पारदर्शक शासन घडविण्याची भूमिका याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने उपस्थित मान्यवरांसह नागरिकांनी मतदान करण्याची शपथ घेतली.यावेळी “मी नक्की मतदान करणार” या संकल्पनेवर आधारित स्वाक्षरी अभियान राबविण्यात आले. अनेक नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवून संकल्पपत्रावर स्वाक्षरी केली. या माध्यमातून आगामी निवडणुकीत शंभर टक्के मतदानाचा संदेश प्रभावीपणे समाजात पोहोचविण्यात आला.या उपक्रमादरम्यान आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देत सकाळच्या वेळेत नियमित चालणे, व्यायाम व सकारात्मक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही करण्यात आले. निवडणूक जनजागृतीसोबतच आरोग्य आणि सामाजिक सलोखा या दोन्ही बाबींना स्पर्श करणारा हा उपक्रम नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला.अमरावती महानगरपालिकेच्या या अभिनव आणि लोकाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, आगामी सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांचा सहभाग वाढविण्यास ‘हॅपी स्ट्रीट’ उपक्रम मोलाची भूमिका बजावेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.या उपक्रमात शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, जनसंपर्क अधिकारी भुषण पुसतकर, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी पंकज सपकाळ, कैलास कुलट, झीन विजयालक्ष्मी यादव, झीन मोहनिश मिसाल ,योगगुरू डॉ. अश्विनी राऊत, योगशिक्षीका सुषमा देऊळकर ( शिरभाते ) , शुभम पंदे , नुतन निघोट, दिक्षा वानखडे , अभिजीत,अखिलेश अहिर, शुभांगी मोहिते, योगेश, रविंद्र घुगरे , विलोचना , मेघा, प्रणिता कोलते, हरीश यादव, महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी