
अमरावती, 29 डिसेंबर (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दोन्ही पक्षांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना वेग आला असला तरी अंतिम तोडगा न निघाल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली आहे. जागावाटपाच्या संदर्भात होणारी महत्त्वाची बैठक ऐनवेळी बदलण्यात आल्याने चर्चांना आणखी वेगळे वळण मिळाले आहे. सुरुवातीला ही बैठक शहरातील हॉटेल मैफिल इन येथे होणार होती; मात्र शेवटच्या क्षणी बैठक स्थळ बदलून ती आता एका खाजगी महाविद्यालयाच्या परिसरात सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या बैठकीत शिवसेनेचे मंत्री संजय राठोड आणि भाजपचे नेते संजय कुटे यांच्यात थेट चर्चा सुरू असून, दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत जागावाटपावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप कोणताही ठोस निर्णय झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. महानगरपालिका निवडणूक जवळ येत असताना जागावाटपाचा तिढा लवकर सुटावा, यासाठी दोन्ही पक्षांवर दबाव वाढत आहे. या बैठकीतून नेमका काय निर्णय बाहेर येतो, याकडे अमरावतीतील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून असलेल्या सर्वांचे लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी